मात्र आपत्कालीन बैठका घेण्यास महसूल प्रशासन उदासीन
पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाथसागर (जायकवाडी) जलाशयात पाण्याची आवक सातत्याने सुरू असून जलाशय ८७ टक्के भरला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून गोदावरी नदीकाठच्या गावांसह पैठण शहरावरही पूरस्थितीचे संकट निर्माण होऊ शकते.
विशेष म्हणजे, यापूर्वीही पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे धरणातून अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह पैठण शहरात महापुराचे पाणी घुसले होते. या पुरात नागरिकांच्या घरांचे, शेतीपिकांचे, व्यापाऱ्यांचे जनावरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आगाऊ नियोजनाची गरज व्यक्त होत आहे.
मात्र, जलाशय ८७ टक्के भरला असतानाही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल झालेली दिसून येत नाही. आपत्कालीन बैठका,
बचाव पथकांची तयारी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महसूल प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटनांकडून होत आहे.














